Saturday, 18 June 2016

                                                   तळे  
          विस्तीर्ण पसरलेले शांत, निळे तळे मला ध्यानस्थ योग्या प्रमाणे वाटते. वाऱ्याच्या अनवट लहरींनी तळ्याच्या निळसर पाठीवर वर्तुळाकार शहरे यावेत अन् तळ्याच्या त्या मोहमयी रुपावर काठावरच्या झाडांनी फिदा व्हावे. त्यांनी हलकेच आपली पाने तळ्याच्या कातीव देहावर उधळावीत आणि हे आपण तळ्याच्या काठावर उभे राहून पहावे,या सारखा आनंद मला वाटते दुसरा नसावा...
          का कुणास ठाऊक तळे माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे.तळ्यांची विलक्षण बेभान रूपे मला बघता आली, त्यांचे राजस लावण्य मनसोक्त पाहता आले. त्यांचे निशब्द चैतन्य जगता आले.त्यांचे अथांग पण भोगता आले, माझे एकाकीपण त्यांना सांगता आले. तळ्यांच्या थंड शिरशिरत्या पाण्यात डोळे बंद करून डुंबता आले....
          मला आठवतेय...मी आण्णांच्या म्हणजे माझ्या वडिलांच्या सायकल वर बसून तालुक्याच्या गावी जाई. त्या वेळेस एस्. टी.बसेस फारशा नव्हत्याच.त्यामुळे प्रवास हा सायकलचाच असायचा. आण्णा भल्या सकाळी तालुक्याला निघत...मी पाठीमागे निवांत बसलेलो असायचो.सकाळचा प्रसन्न गारवा हवेत दाटलेला असायचा. सूर्यफुलांची पिवळी शेते ओलांडीत आमचा प्रवास चालू असायचा.चित्रा सारखी स्थिर सूर्यफुलांची शेते ...खूप दूरवर निळ्यासावळ्या डोंगरांच्या रांगा...त्यावर उगीचच गर्दी करून असलेले पांढऱ्या ढगांचे दुधी पुंजके...मधूनच विहिरीवरच्या मोटेची ऐकू येणारी कुई कुई ... त्या बरोबर गाण्यातून मोटक-याने बैलांना घातलेली प्रेमळ साद, या साऱ्या गोष्टी अगदी चित्रमय असायच्या.कुठेही कसला गोंधळ नाही,गोंगाट नाही...सारे कसे निवांत - स्तब्ध असायचे.त्यातच असायचो आम्ही...आमची सायकल या साऱ्यातून संथ चालायची.सायकलच्या त्या संथपणामुळे अधून-मधून मला डुलकी यायची.मग आण्णा म्हणायचे, ‘झोपलास काय रे तातू??’ ‘ नाही आण्णा ...’ मी खडबडून जागे होत म्हणायचो.आण्णा नंतर सायकलचा स्पीड वाढवत....
          त्यानंतर लांबूनच मला दुरगावाच्या तळ्याची निळी विस्तीर्ण रेघ  दिसे..मी खुश होई.मग मी म्हणे, ‘आण्णा तळ्याच्या भरावा वरून जाऊयात ना?’आण्णा हसून म्हणत, ‘ जाऊ ना....’ आता सायकलचा वेग वाढलेला असे.तळ्याची निळी रेघ खूप जवळ येई.बाजूची हिरवी गर्द झाडे नजरेत भरत. पाण्याच्या नीलकांती देहावरून घुटमळत येणारा वारा मला प्रसन्न बनवी.ढगांची मोहक प्रतिबिंबे डचमळताना दिसत. काठावर कुणी एखादा पाण्यात गळ टाकून निवांतपणे मासेमारी करताना दिसे.पाखरांचे अचल थवे बाजूच्या हिरव्याकंच पाणगवतावर ध्यानस्थ दिसत.
          आम्ही आता तळ्याच्या भरावा जवळ यायचो.आण्णा भरावा कडेची सडक टाळून भरावा वरच्या पायवाटेवरून अगदी संथपणे  सायकल चालवीत.पाण्यावरून घसरत जाणाऱ्या बदक पिलांसारखी अण्णांची सायकल त्या वाटेवरून पुढे जात राही.तळ्यात नंतर दृष्टीस पडत काही पाणकोंबडया, बदकांची घोळक्याने तरंगणारी सुरेख पिले, उंच पायांचे शुभ्र बगळे... त्यांची लांबट प्रतिबिंबे पाण्यावर हलताना दिसत.बाजूच्या काठावर दोरीने बांधलेली एकाकी होडी पाण्यावर मनस्वी डुलताना दिसे....
          आता दिवस उगवून खूप वर आलेला असे.सकाळची वस्त्रे अजून दिवसाच्या अंगावरून निघालेली नसत. सूर्यकिरणांमुळे पाणी सोनेरी चमकताना दिसे.आण्णा घडीभर सायकल उभी करीत आणि आपसूकच त्यांच्या सुरेल गळ्यातून ‘ एका तळ्यात होती बदके पिले सुरेख SSS होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक....’ या गीताची लकेर बाहेर पडे.त्या गाण्याचे सूर, ते धीरगंभीर तळे, त्याच्या काठावरची स्वमग्न झाडे, त्यांची पाण्यातील काळसर हिरवट प्रतिबिंबे, सर्व जगाला विसरून पाण्यात स्वच्छंद तरंगणारी बदक पिले....या साऱ्या जादूभरल्या वातावरणात मी तो विलक्षण देखावा नजरेत साठवण्याचा प्रयत्न करायचो.आजूबाजूला कुणीही नसायचे डाव्या बाजूस खूप खोलवर भरावाच्या पायथ्या जवळून रेघ मारल्या सारखी डांबरी सडक दिसायची.या अशा नि:शब्द वातावरणात तळेच माझ्याशी शब्द बनून बोलत राहायचे....
          कॉलेज मध्ये असताना मी लोखंडद-याच्या तळ्यात पोहायचो. ..त्या तळ्याच्या बाजूला हिरवे गर्द जंगल होते... आजही आहे.त्या जंगलाच्या हिरव्या कोंदणातील निळा हिरा म्हणजे हे तळे.... तळ्याच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे पोहत जायचे हे खूप कठीण काम असायचे.मित्रांसोबत अगदी सकाळी मी त्या तळ्यावर जायचो सकाळच्या तांबूस पिवळ्या उन्हात तळ्याच्या पाण्यात शिरलो की अंगावर थंडीचा काटा येई. पण पुढे दहा बारा फूट पोहत गेलो की ही थंडी पळून जाई. पाणी अंगाला उबदार वाटे.पलीकडच्या तीरावर काही म्हशी पाण्यात डुंबताना दिसत.तळ्याची एक निळी बाजू शेपटा सारखी जंगलात घुसलेली असे.तळ्याच्या मध्यभागी गेल्यावर विश्रांती साठी पाठीवर उताणे पडायचो. पाणी शांत असायचे. वर स्वच्छ निळे आभाळ दिसायचे.त्या निळ्या आभाळाच्या पार्श्वभूमीवर रांगेत उडत जाणारे बगळे आम्ही खूपदा बघायचो... दमून पलीकडच्या तीरावर गेल्यावर जंगलाची  हिरवी गर्द तनु नजरेत भरे. गुडघ्याइतक्या तिथल्या गवतातून बऱ्याचदा राखाडी रंगाचे ससे घाबरून दूर पळताना दिसत.तर कधी आमची ही तमा न बाळगता बिनधास्त चरणारा हरणांचा कळप दिसे.ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात सुद्धा तळ्यात खूप पाणी असे.त्यावेळेस जंगलातील बोरीची झाडे लाल पिवळ्या बोरांनी लगडून गेलेली असत.काही बोरांच्या झाडाखाली तर बोरांचा खच असे..
          लोखंडदऱ्याच्या तळ्यातील पोहण्याचे ते दिवस असे अमृतमयी होते.आता पाऊस असा माणसासारखा बेभरवशाचा झालाय. त्यामुळे या तळ्यात आता फारसे पाणी जमत नाही.आणि त्या जमलेल्या पाण्यात वाहने धुण्यासाठी वाहनाची रांग असते.त्या मुळे तिथे बगळे नाहीत, पाणकोंबडया नाहीत, निवांत चरणारे हरणांचे कळप नाहीत, ती मनाला भावणारी नि:शब्द शांतता नाही.तळ्याचे ते अनाघ्रात सौंदर्य केव्हाच काळवंडलेय.....
          गेल्या वर्षी मी भंडारदरा धरणातून रतनवाडीच्या अमृतेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी नावेतून प्रवास केला. तो अनुभव काही वेगळाच होता.ती सकाळची नऊची वेळ होती.धरणात मस्त अंघोळ करून आम्ही नावेत बसलो.बाजूला धुक्यात हरवलेले कळसूबाई शिखर होते.समोर रतनगडाचा अंगठयासारखा उंचावलेला सुळका दिसत होता.नव्या कोऱ्या नावेतून आमचा तो स्वप्नवत प्रवास सुरु होता.आता अमृतेश्वराला जाण्यासाठी सडक सुद्धा आहे.पण या तळ्यातून तो एक तासाचा केलेला प्रवास आजही माझ्या स्वप्नात येतो.अतिशय नितळ स्वच्छ पाणी, स्वच्छ सूर्यप्रकाश, बाजूच्या पूर्ण हिरव्या डोंगरांच्या सुंदर रांगा, त्यावर झाडांची दाटी आणि त्यातूनच अधून मधून डोकावणारी उतरत्या छपरांची कौलारू घरे.... त्या घरांच्या बाजूला नारळांची दाटी...अंगणात पोपटी रंगाचे भाताचे शेत... काय हवे असते आणखी जगायला? काय हवे असते आणखी विसरायला ? काय हवे असते अजून बेभान व्हायला..ही तळी अशी आपल्याला जगण्याचे रंग देतात.ही तळीं अशी आपल्या  जीवनाची पोकळी विविध रंगानी  रंगवतात.ही तळी अशी आपल्या मनाच्या गूढत्वा  पर्यंत पोहचतात.आणि आपल्यालाच निसर्ग बनवून टाकतात.
          ‘वाल्ट व्हिटमन’  हा अमेरिकन कवी त्याच्या ‘सॉग ऑफ मायसेल्फ’ या कवितेत म्हणतो ,
          ‘I celebrate myself and sing myself
          For every atom belonging to me as good belongs to you…
          I loafe and invite my soul…’ निसर्गाच्या देखण्या रूपाचा आस्वाद घेताना मी स्वत:साठीच जीवनगाणे गातो.मी स्वतःच माझ्या जगण्याचा उत्सव साजरा करतो आणि हे करीत असताना मी स्वतःच तो निसर्ग, ते तळे होऊन जातो..मी आनंदाचा डोह बनून जातो...
                                      भीष्माचार्य लक्ष्मण चांदणे          mob  -  988 1174 988
                                      मु.पो.देवळाली ता.करमाळा जि. सोलापूर
                                      chandanebhisma@gmail.com



Tuesday, 3 November 2015

डाव
भर दुपारची वेळ.ऊन अगदी लख्ख चादरी सारखे पसरलेले.झाडावरची पाखरे शांतपणे आज सावलीला बसून होती.दाट झाडांच्या सावलीत चार दोन गाढवं निवांत पडलेली होती.त्याच झाडाच्या एका कोपऱ्यात मराठी शाळा भरलेली.पत्र्याच्या चार खोल्यात सातवी पर्यंतचे वर्ग दणकून चालू होते.प्रत्येक वर्गातून कवितेचे तसे पाढयांचे सूर ऐकू येत.मधूनच पोरांना घाबरवणारी वेताची छडी सप् कन टेबलावर आपटून वर्गातील गडबड काही काळ शांत करीत होती.गोरखे गुरुजींचा खणखणीत आवाज वर्गात घुमत राही. ‘म्हनारे बे चा पाढा ...हा दादू गणू तू रे उभा रहा ..चल म्हण बे एके बे..बे दुणे चार...करा सुरु.’मग दादू गणूचा आवाज वर्गात दणाणे.त्याच्या मागोमाग पहिली व चौथीची इरसाल पोरं डोळे झाकून पाढे म्हणण्यात दंग होत.त्यांच्या आवाजाने काही काळ बाजूच्या झाडावरची पाखरे दचकून जागी होत.शाळे मागच्या मारुतीच्या देवळात पत्त्यांच्या डावात रंगलेली म्हातारी माणसे कान टवकारत. शाळेच्या भिंतीवर,खूप उंचीच्या लगी वरून इकडे तिकडे भुरभुरणाऱ्या चिमण्या घाबरून शांत बसून राहत.
          मग गोरखे गुरुजी खुर्चीत मागे रेलून डोळे बंद करीत.अन् असल्या गदारोळात लगोलग घोरू लागत.पाढे रंगात येत तसा गुरुजींचा घोरण्याचा सूर टिपेला पोहचे.पाढे म्हणता म्हणता एक मुलगा दुसऱ्याच्या शर्ट वर शाई शिंपडी त्यामुळे त्यांचा वाद वाढून त्याचे रुपांतर धराधरित होई.बाकीची गरीब अध्यात मध्यात नसणारी पोरं त्यांच्या मारामारीत विनाकारण मार खात.मग पाढयाचे रुपांतर पोरांच्या रडण्यात ओरडण्यात होई.तसे गुरुजी भानावर येत छडी जोरदार पणे लाकडी टेबलावर आपटून म्हणत ‘भडव्यानो काय गोंधळ चाललाय रे? घालुका लाथा तुमच्या पेकाटात? उठ रे पम्या काय झाले?...दाम्या जा कोपऱ्यात अंगठे धर..सुमे बावळे जरा बाहेर जाऊन नाक पुसून ये SSSS चल ...’ वर्ग क्षणात चिडीचूप होऊन जाई.गुरुजी वैतागत , ‘काय साली हि कटकट ? दिवस जाता जात नाही. काहीतरी करायला हवे.’ गुरुजींची विचार चक्रे फिरत राहतात.डोक्यात अनेक विचार गर्दी करतात. मग बराच वेळ टेबलावर बोटांनी ताल धरून झाल्यावर त्यांनी मनाशी एक निर्णय घेऊनच टाकला.संध्याकाळी तीस लिटरचे ड्रम घेऊन गाडेगावला जायचेच. च्यायला या खात्याच्या...गेलं उडत हे खात.आता ठरलच ...’ मनाशी एकदा निर्णय घेतल्यामुळे ते थोडेसे रिल्याक्स झाले .पोरांवर थोडेफार डाफरत गुरुजी शाळा सुटायची वाट बघत राहिले.
          मग एकदाची शाळा सुटली.संध्या सूर्याची किरणे झाडांच्या  शेंडयावरून ओघळून खाली आली होती. सोनेरी उन्हाने हिरवे गवत चकाकत होते.शाळेच्या समोर असलेल्या डबक्यात काही उनाड पोरे बेडकांना दगड मारण्यात दंग झाली होती. ‘च्या आयला ह्यांच्या ...कसा यांचा जन्म झाला कुणास ठावं..गाबडी अजून घरी गेली नाइत.’ गुरुजी वैतागले. ‘ये मुडद्यानो जातंय घरी का येऊ तितsssssss गुरुजींचा दम ऐकताच पोर भन्नाट पळून गेली. मग गुरुजींनी सायकलला ते ड्रम बांधले.अन् गाडेगावला जाण्यासाठी सायकलला टांग मारली.
          दुसऱ्या दिवशी अगदी सकाळीच गाडेगाव वरून आणलेले ड्रम गुरुजींनी शाळेच्या मागे छातीभर वाढलेल्या कडू गवतात अगदी खिडकीच्या जवळ बेताने ठेऊन दिले.त्यावर एक नक्षीचा पितळी पेला उपडा ठेऊन दिला.मग खुर्चीत बसून त्यांनी मुलांची हजेरी घ्यायला सुरुवात केली.हजेरी घेताना त्यांचे  लक्ष सतत त्या ड्रम कडे जाई.व मनोमन ते खुश होत. तासाभराने गावात उंडारणारा गोडबोल्या मारुती गवत हाताने वरून त्या ड्रम जवळ गेला.तसे चटकन गुरुजी खिडकी जवळ गेले.आपल्या जाडजूड मिशीवर ताव देत गुरगुरले, ‘चार आण्याला है बग गलास..सस्त है पिऊन बग एकदम कडक ढासू माल आणलाय .’ मारात्याने ग्लास हातात घेतला व ड्रम मधली देशी दारू ग्लासात ओतण्यासाठी ड्रम थोडासा वाकडा केला.ग्लास भरता भरता दोन चार थेंब खाली गवतावर सांडलेच तसे गुरुजी भडकले. ‘मारत्या भडव्या तुज्या बापाचा माल है कारे सांडायला ...जपून वत..हा..वड आता.’मारात्याने ग्लास तोंडाला लावला.जळजळीत दारू घशाला जाळीत पोटात गेली.तसे मारात्याने तोंड वाकडे केले.
‘कारे काय झाले.’
‘लै कडक है राव हे रसायन.’मारत्या बोलला.
‘मग पैसा घेतो आपन, कडकच द्या पायजेल ना ?’गुरुजी हसत म्हणाले.मारात्याने आठ आणे गुरुजींच्या हातावर टेकवले व दोन ग्लास वडून  तो निघून गेला.
          गावातल्या दारुड्यांना हि बातमी कळायला वेळ लागला नाही.दिवस भर दारूड्यांची वर्दळ शाळेच्या मागच्या बाजूला होत राहीली तसा गुरुजींचा खिसा चिल्लरने फुगत गेला.संध्याकाळ पर्यंत ते ड्रम रिकामे होऊन जात असे.शाळा सुटण्याच्या वेळेस गुरुजी समाधानाने दिवस भराचा जमलेला गल्ला मोजण्यात दंग होत.शाळा सुटली की पुन्हा ते ड्रम सायकलला बांधून गुरुजी गाडेगाव कडे निघत.
          आता दररोजचा गुरुजींचा हा कार्यक्रम सुरु झाला.वर्गात दुपारच्या गच्च शांततेत शाळेतील मुलांचा गलबलाट विरून जाई.पत्त्यांचा डाव जिंकल्यावर देवळाच्या पारावर बसलेल्या म्हाताऱ्यांचा कलकलाट गुरुजींची तंद्री भंग करी.टेबलावरून पाय खाली घेऊन गुरुजी त्या म्हाताऱ्यांवर   भडकत. ‘इचीभाना या म्हाताऱ्यांच्या ...गप् घरात पडून रहायचे ते हिथं मरत्यात हि थेरडी.नुसता कालवा चाललाय.’तेवढ्यात खिडकीतून त्यांना डुलत डुलत येणारे दोन बेवडे दिसले.त्यांच्या कडे बघत असतानाच त्यांचे सहकारी जाधव गुरुजी आत आले.त्यांच्या कडे हसून बघत गोरखे म्हणाले, ‘बगा  राव कसाय आपला माल..कशी डूलत्यात मानसं ...जो डुलत नाय तो बेवडा नाय...’ असे म्हणून गुरुजी खो खो हसत सुटले.जाधव गुरुजी मात्र चिंताक्रांत बनले.अगदी हळू आवाजात ते गोरखे गुरुजींना म्हणाले , ‘गुरुजी हि बातमी ऑफिसला कळलीय बरका.हे सारे बंद करून टाका.आपण सारे गोत्यात येऊ.’ ‘गप् बसा हो जाधव..बगुच काय माजं करत्यात हे. इस वर्स झाली या गावात हाय करत्यात का माजी बदली?बोलना? जाधव शांत बसले.कागदावर त्यांची सही घेऊन त्यांच्या वर्गात निघून गेले.
          त्या नंतर एके दिवशी भर दुपारी रणरणत्या उन्हात शिक्षण खात्याचा कुणी एक अधिकारी भाड्याची सायकल दामटीत गाडेगाव वरून शाळेत आला.तालुक्याच्या गावातून गाडेगाव पर्यंत एस्.टी.बसने व गाडेगावातून या शाळे पर्यंत भाड्याची सायकल घेऊन अगदी घामाघूम होऊन ते शाळेत रागानेच घुसले. ‘काय या मास्तराने डोक्याला ताप करून ठेवलाय देवा..काय याला गरज है का गावात हातभट्टी विकायची? बघतोच याच्याकडे?’सायकल उभी करून ते तडकच वर्गात शिरले.नेहमी प्रमाणे मुले पाढा म्हणण्यात दंग होती.गुरुजी निवांत बसलेले.गवतातील ड्रम उन्हात सुकून गेलेले.साहेब आल्या आल्याच गुरुजीवर तडकले. ‘काय लावलेय हे गोरखे ? जनाची नाही तरी मनाची लाज ठेवा.का शिक्षण खात्याला काळीमा फासताय?’ त्यांना बघून गुरुजींच्या कपाळावर आठ्या आल्या. त्रासिक चेहरा करून गुरुजी म्हणाले , ‘तुम्ही कोण?’ ‘तुम्ही मला  ओळखत नाहीका गोरखे?’ ‘नाय ओळखत ?..तुमच्या कडे ओळखपत्र आहे का?’ ‘नाही..पण..’साहेब जर नरमले. ‘मंग पण बिन काय नाय.आयला कुनीबी येतंय आन शाळेत घुसतंय...च्यायला काय कामं बीमं न्हाईत का तुमाला? शाळा म्हणजे काय धर्मशाळा वाटली काय तुमाला? पाहिलं बाहेर व्हा.’गुरुजी भडकले. ‘गोरखे गुरुजी मी –मी अधिकारी आहे खात्याचा.पंचायत समितीत एरवी येऊन भेटून जाता.अन् आत ओळख विसरली काय?’ साहेबांना आता जरा जोर चढला. ‘हे बघा ..मी या शाळेचा मुख्याध्यापक आहे.तुमी अधिकारी कशावरून? कुनीबी भामटा अधिकारी म्हणून येईल, मला कसं कळायचं? तवा तुमचं ओळखपत्र दाखवा,मंग बघू? हाय का ओळख पत्र ?’ ‘.........’  ‘न्हाई?...मंग व्हा बाहेर. मला शिकवू द्या पोरास्नी. नका माजा वेळ खाऊ.करुद्या मला ड्यूटी’ गुरुजी एका दमात बोलले.गुरुजींचा हा अवतार बघून साहेब निम्मे उतरले.थोडीशि स्वरात नरमाई आणून म्हणाले, ‘पण तुम्ही दारू विकता म्हणजे....चुकीचंच आहे ना?’ ‘प्यायची का तुमाला?’ गोरखे. ‘छा –छा काय बोलता राव ..’ ‘मंग सुटायचं ..हिथं थांबायचं न्हाई ..’ गुरुजींनी त्यांना निर्वाणीचे  सांगितले. त्या दोघांचा आरडाओरडा एकून बाकीचे दोघे मास्तर लोक तिथे जमा झाले.त्यांनी साहेबाला समजावून दुसऱ्या  वर्गात नेले.कोतवालाला निरोप दिला आणि त्यांच्या जेवणाची चांगली व्यवस्था करून त्यांना मानाने गाडेगावाकडे रवाना केले.साहेब दुपारी चारलाच सायकल दामटत निघून गेले.
          गुरुजींचा धंदा मात्र आता जोरात चालू होता.गावातील त्यांचे विरोधक मात्र अस्वस्थ होते.पण गावातील दारुडे मात्र खुश असत.गुरुजींचा कडक माल आणि उधारी पाधारी यामुळे गिऱ्हाईकाची वाढ झाली होती.विरोधकांनी गुपचूप गुरुजी विरोधात एक सह्यांची मोहीम उघडली.एक तक्रार अर्ज तयार केला.व एके दिवशी तो अर्ज पंचायत समिती व पोलीस स्टेशन यांना नेऊन दिला.याची कसलीही कल्पना गुरुजींना नव्हती.सरपंच, पाटील व गावातील प्रतिष्ठीत लोकांनी गुरुजींची कर्म कहाणी फौजदार यांना सांगितली.हे सारे एकून त्यांची तळपायाची आग मस्तकाला गेली.टेबलावर मूठ आपटून ते म्हणाले, ‘भलतंच माजलेय बेनं, करतो त्याला सरळ.दोन दिवसांनी टाकतो धाड अन् कोंबतो त्याला आत.तुम्ही निश्चिंत रहा.’साहेबांचे आश्वासन घेऊन सारी मंडळी गावाकडे परतली व त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहू लागली.
          या साऱ्या कारस्थानापासून दूर असलेले गुरुजी रोज पैशाचा गल्ला  गोळा करण्यात दंग असत.दुसरे ड्रम मांडण्याचा विचार अधून मधून त्यांच्या डोक्यात डोकाऊ लागला.त्यांचे सहकारी मात्र चिंताक्रांत असत.
          तो दिवस उजाडला.भर दुपारी धुरळा उडवीत पोलिसांची जीप शाळेच्या पुढे थांबली.दोन पोलिसांनी पटापट गाडीतून खाली उड्या मारल्या व पळतच ते शाळेच्या मागच्या गवतात घुसले.दारूचे ड्रम तिथेच गवतात सताड उघडे पडलेले.त्यावर पालथा घातलेला पितळेचा ग्लास तसाच....ते ड्रम पाहून पोलिसांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या. त्यांनी लगेच पंच जमा करून पंचनाम्याला सुरुवात केली.या वेळेस गुरुजी मात्र टेबलावर पाय टाकून निवांत बसले होते.त्यांनी एकवार खिडकीतून बाहेर नजर टाकली व तो सारा पोलिसांचा, माणसांचा जमावडा बघितला.दणकन टेबलावर छडी  मारून पोरांना म्हणाले, ‘म्हणारे पाढा मोठयाने.’ पोरांनी लगेच मोठ्या आवाजात पाढा सुरु केला.
          इकड मारुतीच्या देवळात ओट्यावर लगेच घोंगड्या अंथरल्या गेल्या.गावातील तक्रारदार,गावकरी,सरपंच,म्हातारे कोतारे सारे झाडून देवळापुढे जमा झाले.आज गुरुजींवर धाड पडणार हि बातमी गावात फार थोड्यांनाच माहित होती त्यामुळे ते कुठे हि कामाला गेले नव्हते.फौजदार,शिक्षण खात्याचे अधिकारी घोंगडीवर बसले.कोतवालाने लगेच पाण्याचा तांब्या व कळशी तेथे मांडली व तो कोपऱ्यात भेदरलेल्या चेहऱ्याने जाऊन उभा राहिला.
          थोडं वातावरण शांत झाल्यावर फौजदार गरजले, ‘ये बोलवारे त्या मास्तरला.’ त्यांचा आवाज ऐकून कोतवाल लगेच शाळेकडे सुटला.शिक्षणखात्याची माणसे चिंताक्रांत चेहऱ्याने एकमेकाकडे बघू लागली.तर काही गावकऱ्यांना आतून आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या.कोतवाल धापा टाकतच शाळेत पोहचला.गुरुजी निवांत होते.काळजी भीती कसलीही चिंता त्यांच्या चेहऱ्यावर नव्हती.कोतवाल घाबरतच बोलला, ‘गुर्जी रावसाहेबांनी तुमास्नी बोलीवलय, चला लवकर.’ ‘व्ह म्होरं—आलोच मी.’ गुरुजी बोलले.मग बटव्यातील तंबाखू हातावर घेऊन त्यांनी चुन्याची पितळी डबी काढली.त्यातला चुना पितळी काडीने काढून तंबाखूला लावला.व पोरांकडे बघून म्हणाले, ‘म्हनारे पाढा,आलोच मी.’ हातावर                          तंबाखू चोळतच ते बाहेर गेले.त्यांच्या सोबत त्यांचे दोन सोबती सुद्धा कोतावालासोबत निघून गेले.त्यांच्या मागून जरावेळाने सातवीचे विद्यार्थी, त्यानंतर सहावीचे व असे करीत सारी शाळाच देवळाकडे जमा झाली.धोतराचा सोगा खांद्यावर टाकून अगदी डौलदारपणे गुरुजी चालत होते.त्यांना बघून मारुतीचं सार पटांगण शांत झालं.फौजदार मिशीला पिळ देत लोडाला टेकून बसला होता.गुरुजी जवळ येताच तो गुरकावला, ‘काय गुर्जी..तुमी म्हंजे  तुमच्या पेशाला काळीमा फासताय.गुर्जी तुमी आन हे असले धंदे? थोडीफार मनाची नाहीतर जनाची लाज ठेवा.’साहेबांचा आवाज आता टिपेला गेला होता. ‘साहेब शब्द जपून वापरा...कसले धंदे?? कसली लाज?? काय बोलताय हे तुमाला तरी कळतयं का?मी एका शाळेचा जबाबदार मुख्याध्यापक आहे.अन् काय आरोप लावताय?’ गुरुजी एका दमात बोलले. ‘काय म्हंजे तुमी गावात दारू इकताय राजरोस अन् वर थोबाड उचकटून मला बोलताय?’ साहेब घोगडी वरून बाजूला सरकून ताठ बसले.वातावरणात एकदम शांतता पसरली.गावकरी तोंडं वासून या दोघांकडे बघत होते.पोरांचा गलका थांबला होता.गर्दीला बाजूला सारून गुरुजी पुढे झाले.तसे साहेब कडाडले, ‘तुमच्या शाळेच्या मागे हे ड्रम घावलेय,त्यात दारू हाय.पन्नास गावकऱ्यांनी तुमच्या विरोधात तक्रार दिलीय अन् आज हा मुद्देमाल घावलाय गुर्जी..चोर तो चोर अन् वर शिरजोर..मादरचोद ..’साहेब एकेरीवर व शिवीगाळीवर आले. तसे गुरुजी खवळले.साहेबांच्या नजरेत नजर मिळवून ते सुद्धा गरजले, ‘साहेब मी ऑन ड्युटी हाय ..तुमी रेड टाकली तवा मी कुट होतो?’
‘कुट म्हंजे वर्गात होता.’
‘पोरं काय करीत व्हती ?’
‘पाढा म्हणत होती.’
‘अंग अशी ..म्हंजे माझं अध्यापनाच काम चालू व्हतं ....बरोबर?’
‘व्हयं....’
‘तुमाला ड्राम कुट घावलं?’   
‘शाळेच्या मागच्या गवतात...त्यावर गलास पण हाय’
‘त्याच्यावर माज नाव हाय?’
‘नाय.’
‘मंग ड्राम वर हाय?’
‘छ्या... छ्या त्यावर बी नाय.’  
‘मंग असा बगा....या गावात मी इस वर्स झाली हाय.माजी बदली करा असं मी खात्याला सांगतोय पण माजी बदली व्हतं नाय .अन्  दुसरं म्हण्जे हे सारं गाव माज्या वाईटावर हाय .आज मला गोत्यात आणण्यासाठी त्यांनी गवतात दारूचे ड्राम मांडले, उद्या गांजाचे पोते ठीवतील अन् तुमाला तक्रार देतील की गुर्जी गांज्या इकतोय.’गुरुजी एका दमात बोलले.त्यांचे बोलणे संपल्या बरोबर गटशिक्षण अधिकारी लगेच म्हणाले , ‘बघा साहेब मी म्हणालो नव्हतो का आमचे शिक्षक असलं काहीही करणार नाहीत.त्यांच्यावर उगीचच हा आळ आणलाय.’ हे ऐकून फौजदार नाराज झाले.त्यांनी डोक्यावरची टोपी फट्कन खाली आपटली.मग कडाडले, ‘कोनी अर्ज आणला होता माज्याकडं? जाम पुराव्याशिवाय काहीच करायचे नाय हे माहित नाय का त्यांना? आमची तालुक्याची कामं सोडून आमी हितं काय मास्तराची ......आलोय का?’ वातावरण एकदम थंड झाले.त्या वातावरणाचा रागरंग बघून गुरुजी बोलले, ‘माज्या सहकाऱ्यांना इचारा ..हिथं  हि पोरं हैत त्यांना इचारा....पोरांनो मी दारू इकतो कारे?’ ‘न्हाय गुरुजी..’पोरं एका सुरात ओरडली तशी गुरुजींनी समाधानाने मान डोलावली.साहेबांकडे हसून बघत बोलले, ‘चलू का साहेब? माजं अध्यापनाचं काम राहिलंय..पोरांना शिकवायचंय ..नायतर पुन्हा तुमीच वरडाल ..चलारे पोरांनो.’ हैssss असा आवज करून पोरं शाळेत पळाली.त्यांच्या मागून गोरखे गुरुजी व त्याचे सहकारी हात मागे टांगून हास्य विनोदात शाळेकडे निघाले. मारुतीच्या पारावर बसलेले साहेब मात्र साऱ्या अर्जदारांना शिव्याची लाखोली वाहत अस्वस्थपणे हातवारे करीत होते.
                                                                   श्री भीष्माचार्य लक्ष्मण चांदणे.

                                                                   मु.पो.देवळाली ता.करमाळा जि.सोलापूर.

Thursday, 13 August 2015

ती

ती असतेच अशी ...काहीशी चंचल, थोडीशी गंभीर ..घाटातल्या वाटेसारखी अवखळ...तळ्याच्या निळ्या पाण्यासारखी नितळ..दरीत कोसळणाऱ्या जलधारे सारखी प्रवाही...कधी ती असते मंदिरातल्या गाभाऱ्या सारखी प्रसन्न...पाऊस थेंबांनी भिजलेली सुस्नात ...ती असतेच अशी.....
             ती असतेच अशी.कधी हसणारी कधी रुसणारी.तिने फेसबुक वर टाकलेल्या कुठल्याशा पोस्टला त्याने लाइक केले नाही तर त्याला फ्रेंड लिस्ट मधून डिलीट करणारी ..अन् संध्याकाळी पुन्हा त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणारी...ती असतेच अशी...
              त्याला हे सारं माहित आहे..तिचं रुसणं फुगणं तो जाणून आहे.तिच्या लाडिक तक्रारीवर तो काहीच बोलत नाही.तिच्या बोलण्याने तो तुटत नाही.त्याचं नातं एवढ्या तेवढयाने मिटत नाही.. .प्रमाणे बसलेली गाठ अशी अचानक सुटत नाही..
            तो तिला बहरू देतो...वेली सारखं स्वच्छंद वाढू देतो.तिचं रागावणं, रुसणं, चिडणं सारं काही तो पापण्यावर तोलतो.कारण ...
        त्याच्या जीवनात तिचा एक अनमोल रोल आहे...
        त्याच्या साठी तिला म्हणूनच खास मोल आहे....

असंच काही

एकटेपणा इतकं विषण्ण करणारं दु:ख जगात दुसरं नसेल. आजूबाजूला माणसांचा समुद्र असतो,गर्दीचा कोलाहल असतो तरी सुद्धा त्या साऱ्या मध्ये आपण तनहा असतो.ही तन्हाई हे एकटेपण रात्रीच्या तिसऱ्या प्रहार इतकं काळजाला जखमी करणारं असतं.शुभ्र चांदण्या रात्री तळ्याच्या चमचमणाऱ्या काठावरच्या उदास झाडासारखे असते....डोहात स्वतःचं प्रतिबिंब पाहणाऱ्या निस्तेज औदुंबरा सारखे असते...मग आपोआपच मन कुणाला तरी साद घालते..
                                      'अकेले है चले आओ जहां हो..
                                       कहा आवाज दे तुमको कहां हो....' ही आर्तता मनाला वितळवणारी असते...मनाला भाव विभोर करणारी असते...कुणी तरी सोबतीला असावे हेच खरे....