डाव
भर दुपारची वेळ.ऊन
अगदी लख्ख चादरी सारखे पसरलेले.झाडावरची पाखरे शांतपणे आज सावलीला बसून होती.दाट
झाडांच्या सावलीत चार दोन गाढवं निवांत पडलेली होती.त्याच झाडाच्या एका कोपऱ्यात
मराठी शाळा भरलेली.पत्र्याच्या चार खोल्यात सातवी पर्यंतचे वर्ग दणकून चालू
होते.प्रत्येक वर्गातून कवितेचे तसे पाढयांचे सूर ऐकू येत.मधूनच पोरांना घाबरवणारी
वेताची छडी सप् कन टेबलावर आपटून वर्गातील गडबड काही काळ शांत करीत होती.गोरखे
गुरुजींचा खणखणीत आवाज वर्गात घुमत राही. ‘म्हनारे बे चा पाढा ...हा दादू गणू तू
रे उभा रहा ..चल म्हण बे एके बे..बे दुणे चार...करा सुरु.’मग दादू गणूचा आवाज
वर्गात दणाणे.त्याच्या मागोमाग पहिली व चौथीची इरसाल पोरं डोळे झाकून पाढे
म्हणण्यात दंग होत.त्यांच्या आवाजाने काही काळ बाजूच्या झाडावरची पाखरे दचकून जागी
होत.शाळे मागच्या मारुतीच्या देवळात पत्त्यांच्या डावात रंगलेली म्हातारी माणसे कान
टवकारत. शाळेच्या भिंतीवर,खूप उंचीच्या लगी वरून इकडे तिकडे भुरभुरणाऱ्या चिमण्या
घाबरून शांत बसून राहत.
मग गोरखे गुरुजी खुर्चीत मागे रेलून
डोळे बंद करीत.अन् असल्या गदारोळात लगोलग घोरू लागत.पाढे रंगात येत तसा गुरुजींचा
घोरण्याचा सूर टिपेला पोहचे.पाढे म्हणता म्हणता एक मुलगा दुसऱ्याच्या शर्ट वर शाई
शिंपडी त्यामुळे त्यांचा वाद वाढून त्याचे रुपांतर धराधरित होई.बाकीची गरीब अध्यात
मध्यात नसणारी पोरं त्यांच्या मारामारीत विनाकारण मार खात.मग पाढयाचे रुपांतर
पोरांच्या रडण्यात ओरडण्यात होई.तसे गुरुजी भानावर येत छडी जोरदार पणे लाकडी
टेबलावर आपटून म्हणत ‘भडव्यानो काय गोंधळ चाललाय रे? घालुका लाथा तुमच्या पेकाटात?
उठ रे पम्या काय झाले?...दाम्या जा कोपऱ्यात अंगठे धर..सुमे बावळे जरा बाहेर जाऊन
नाक पुसून ये SSSS चल ...’ वर्ग क्षणात चिडीचूप होऊन
जाई.गुरुजी वैतागत , ‘काय साली हि कटकट ? दिवस जाता जात नाही. काहीतरी करायला
हवे.’ गुरुजींची विचार चक्रे फिरत राहतात.डोक्यात अनेक विचार गर्दी करतात. मग बराच
वेळ टेबलावर बोटांनी ताल धरून झाल्यावर त्यांनी मनाशी एक निर्णय घेऊनच टाकला.संध्याकाळी
तीस लिटरचे ड्रम घेऊन गाडेगावला जायचेच. च्यायला या खात्याच्या...गेलं उडत हे खात.आता
ठरलच ...’ मनाशी एकदा निर्णय घेतल्यामुळे ते थोडेसे रिल्याक्स झाले .पोरांवर
थोडेफार डाफरत गुरुजी शाळा सुटायची वाट बघत राहिले.
मग एकदाची शाळा सुटली.संध्या सूर्याची
किरणे झाडांच्या शेंडयावरून ओघळून खाली
आली होती. सोनेरी उन्हाने हिरवे गवत चकाकत होते.शाळेच्या समोर असलेल्या डबक्यात
काही उनाड पोरे बेडकांना दगड मारण्यात दंग झाली होती. ‘च्या आयला ह्यांच्या ...कसा
यांचा जन्म झाला कुणास ठावं..गाबडी अजून घरी गेली नाइत.’ गुरुजी वैतागले. ‘ये
मुडद्यानो जातंय घरी का येऊ तितssss ऑsss गुरुजींचा दम ऐकताच पोर भन्नाट पळून गेली. मग गुरुजींनी सायकलला ते ड्रम
बांधले.अन् गाडेगावला जाण्यासाठी सायकलला टांग मारली.
दुसऱ्या दिवशी अगदी सकाळीच गाडेगाव वरून
आणलेले ड्रम गुरुजींनी शाळेच्या मागे छातीभर वाढलेल्या कडू गवतात अगदी खिडकीच्या
जवळ बेताने ठेऊन दिले.त्यावर एक नक्षीचा पितळी पेला उपडा ठेऊन दिला.मग खुर्चीत
बसून त्यांनी मुलांची हजेरी घ्यायला सुरुवात केली.हजेरी घेताना त्यांचे लक्ष सतत त्या ड्रम कडे जाई.व मनोमन ते खुश होत.
तासाभराने गावात उंडारणारा गोडबोल्या मारुती गवत हाताने वरून त्या ड्रम जवळ
गेला.तसे चटकन गुरुजी खिडकी जवळ गेले.आपल्या जाडजूड मिशीवर ताव देत गुरगुरले, ‘चार
आण्याला है बग गलास..सस्त है पिऊन बग एकदम कडक ढासू माल आणलाय .’ मारात्याने ग्लास
हातात घेतला व ड्रम मधली देशी दारू ग्लासात ओतण्यासाठी ड्रम थोडासा वाकडा केला.ग्लास
भरता भरता दोन चार थेंब खाली गवतावर सांडलेच तसे गुरुजी भडकले. ‘मारत्या भडव्या
तुज्या बापाचा माल है कारे सांडायला ...जपून वत..हा..वड आता.’मारात्याने ग्लास
तोंडाला लावला.जळजळीत दारू घशाला जाळीत पोटात गेली.तसे मारात्याने तोंड वाकडे
केले.
‘कारे काय झाले.’
‘लै कडक है राव हे
रसायन.’मारत्या बोलला.
‘मग पैसा घेतो आपन,
कडकच द्या पायजेल ना ?’गुरुजी हसत म्हणाले.मारात्याने आठ आणे गुरुजींच्या हातावर
टेकवले व दोन ग्लास वडून तो निघून गेला.
गावातल्या दारुड्यांना हि बातमी कळायला
वेळ लागला नाही.दिवस भर दारूड्यांची वर्दळ शाळेच्या मागच्या बाजूला होत राहीली तसा
गुरुजींचा खिसा चिल्लरने फुगत गेला.संध्याकाळ पर्यंत ते ड्रम रिकामे होऊन जात
असे.शाळा सुटण्याच्या वेळेस गुरुजी समाधानाने दिवस भराचा जमलेला गल्ला मोजण्यात
दंग होत.शाळा सुटली की पुन्हा ते ड्रम सायकलला बांधून गुरुजी गाडेगाव कडे निघत.
आता दररोजचा गुरुजींचा हा कार्यक्रम
सुरु झाला.वर्गात दुपारच्या गच्च शांततेत शाळेतील मुलांचा गलबलाट विरून
जाई.पत्त्यांचा डाव जिंकल्यावर देवळाच्या पारावर बसलेल्या म्हाताऱ्यांचा कलकलाट
गुरुजींची तंद्री भंग करी.टेबलावरून पाय खाली घेऊन गुरुजी त्या म्हाताऱ्यांवर भडकत. ‘इचीभाना या म्हाताऱ्यांच्या ...गप् घरात
पडून रहायचे ते हिथं मरत्यात हि थेरडी.नुसता कालवा चाललाय.’तेवढ्यात खिडकीतून
त्यांना डुलत डुलत येणारे दोन बेवडे दिसले.त्यांच्या कडे बघत असतानाच त्यांचे
सहकारी जाधव गुरुजी आत आले.त्यांच्या कडे हसून बघत गोरखे म्हणाले, ‘बगा राव कसाय आपला माल..कशी डूलत्यात मानसं ...जो
डुलत नाय तो बेवडा नाय...’ असे म्हणून गुरुजी खो खो हसत सुटले.जाधव गुरुजी मात्र
चिंताक्रांत बनले.अगदी हळू आवाजात ते गोरखे गुरुजींना म्हणाले , ‘गुरुजी हि बातमी
ऑफिसला कळलीय बरका.हे सारे बंद करून टाका.आपण सारे गोत्यात येऊ.’ ‘गप् बसा हो
जाधव..बगुच काय माजं करत्यात हे. इस वर्स झाली या गावात हाय करत्यात का माजी बदली?बोलना?
जाधव शांत बसले.कागदावर त्यांची सही घेऊन त्यांच्या वर्गात निघून गेले.
त्या नंतर एके दिवशी भर दुपारी रणरणत्या
उन्हात शिक्षण खात्याचा कुणी एक अधिकारी भाड्याची सायकल दामटीत गाडेगाव वरून शाळेत
आला.तालुक्याच्या गावातून गाडेगाव पर्यंत एस्.टी.बसने व गाडेगावातून या शाळे
पर्यंत भाड्याची सायकल घेऊन अगदी घामाघूम होऊन ते शाळेत रागानेच घुसले. ‘काय या
मास्तराने डोक्याला ताप करून ठेवलाय देवा..काय याला गरज है का गावात हातभट्टी
विकायची? बघतोच याच्याकडे?’सायकल उभी करून ते तडकच वर्गात शिरले.नेहमी प्रमाणे
मुले पाढा म्हणण्यात दंग होती.गुरुजी निवांत बसलेले.गवतातील ड्रम उन्हात सुकून
गेलेले.साहेब आल्या आल्याच गुरुजीवर तडकले. ‘काय लावलेय हे गोरखे ? जनाची नाही तरी
मनाची लाज ठेवा.का शिक्षण खात्याला काळीमा फासताय?’ त्यांना बघून गुरुजींच्या
कपाळावर आठ्या आल्या. त्रासिक चेहरा करून गुरुजी म्हणाले , ‘तुम्ही कोण?’ ‘तुम्ही
मला ओळखत नाहीका गोरखे?’ ‘नाय ओळखत
?..तुमच्या कडे ओळखपत्र आहे का?’ ‘नाही..पण..’साहेब जर नरमले. ‘मंग पण बिन काय
नाय.आयला कुनीबी येतंय आन शाळेत घुसतंय...च्यायला काय कामं बीमं न्हाईत का तुमाला?
शाळा म्हणजे काय धर्मशाळा वाटली काय तुमाला? पाहिलं बाहेर व्हा.’गुरुजी भडकले.
‘गोरखे गुरुजी मी –मी अधिकारी आहे खात्याचा.पंचायत समितीत एरवी येऊन भेटून
जाता.अन् आत ओळख विसरली काय?’ साहेबांना आता जरा जोर चढला. ‘हे बघा ..मी या शाळेचा
मुख्याध्यापक आहे.तुमी अधिकारी कशावरून? कुनीबी भामटा अधिकारी म्हणून येईल, मला
कसं कळायचं? तवा तुमचं ओळखपत्र दाखवा,मंग बघू? हाय का ओळख पत्र ?’ ‘.........’ ‘न्हाई?...मंग व्हा बाहेर. मला शिकवू द्या पोरास्नी.
नका माजा वेळ खाऊ.करुद्या मला ड्यूटी’ गुरुजी एका दमात बोलले.गुरुजींचा हा अवतार
बघून साहेब निम्मे उतरले.थोडीशि स्वरात नरमाई आणून म्हणाले, ‘पण तुम्ही दारू विकता
म्हणजे....चुकीचंच आहे ना?’ ‘प्यायची का तुमाला?’ गोरखे. ‘छा –छा काय बोलता राव
..’ ‘मंग सुटायचं ..हिथं थांबायचं न्हाई ..’ गुरुजींनी त्यांना निर्वाणीचे सांगितले. त्या दोघांचा आरडाओरडा एकून बाकीचे
दोघे मास्तर लोक तिथे जमा झाले.त्यांनी साहेबाला समजावून दुसऱ्या वर्गात नेले.कोतवालाला निरोप दिला आणि
त्यांच्या जेवणाची चांगली व्यवस्था करून त्यांना मानाने गाडेगावाकडे रवाना
केले.साहेब दुपारी चारलाच सायकल दामटत निघून गेले.
गुरुजींचा धंदा मात्र आता जोरात चालू
होता.गावातील त्यांचे विरोधक मात्र अस्वस्थ होते.पण गावातील दारुडे मात्र खुश
असत.गुरुजींचा कडक माल आणि उधारी पाधारी यामुळे गिऱ्हाईकाची वाढ झाली
होती.विरोधकांनी गुपचूप गुरुजी विरोधात एक सह्यांची मोहीम उघडली.एक तक्रार अर्ज
तयार केला.व एके दिवशी तो अर्ज पंचायत समिती व पोलीस स्टेशन यांना नेऊन दिला.याची
कसलीही कल्पना गुरुजींना नव्हती.सरपंच, पाटील व गावातील प्रतिष्ठीत लोकांनी गुरुजींची
कर्म कहाणी फौजदार यांना सांगितली.हे सारे एकून त्यांची तळपायाची आग मस्तकाला
गेली.टेबलावर मूठ आपटून ते म्हणाले, ‘भलतंच माजलेय बेनं, करतो त्याला सरळ.दोन
दिवसांनी टाकतो धाड अन् कोंबतो त्याला आत.तुम्ही निश्चिंत रहा.’साहेबांचे आश्वासन
घेऊन सारी मंडळी गावाकडे परतली व त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहू लागली.
या साऱ्या कारस्थानापासून दूर असलेले
गुरुजी रोज पैशाचा गल्ला गोळा करण्यात दंग
असत.दुसरे ड्रम मांडण्याचा विचार अधून मधून त्यांच्या डोक्यात डोकाऊ लागला.त्यांचे
सहकारी मात्र चिंताक्रांत असत.
तो दिवस उजाडला.भर दुपारी धुरळा उडवीत
पोलिसांची जीप शाळेच्या पुढे थांबली.दोन पोलिसांनी पटापट गाडीतून खाली उड्या मारल्या
व पळतच ते शाळेच्या मागच्या गवतात घुसले.दारूचे ड्रम तिथेच गवतात सताड उघडे
पडलेले.त्यावर पालथा घातलेला पितळेचा ग्लास तसाच....ते ड्रम पाहून पोलिसांना
आनंदाच्या उकळ्या फुटल्या. त्यांनी लगेच पंच जमा करून पंचनाम्याला सुरुवात केली.या
वेळेस गुरुजी मात्र टेबलावर पाय टाकून निवांत बसले होते.त्यांनी एकवार खिडकीतून
बाहेर नजर टाकली व तो सारा पोलिसांचा, माणसांचा जमावडा बघितला.दणकन टेबलावर
छडी मारून पोरांना म्हणाले, ‘म्हणारे पाढा
मोठयाने.’ पोरांनी लगेच मोठ्या आवाजात पाढा सुरु केला.
इकड मारुतीच्या देवळात ओट्यावर लगेच
घोंगड्या अंथरल्या गेल्या.गावातील तक्रारदार,गावकरी,सरपंच,म्हातारे कोतारे सारे
झाडून देवळापुढे जमा झाले.आज गुरुजींवर धाड पडणार हि बातमी गावात फार थोड्यांनाच
माहित होती त्यामुळे ते कुठे हि कामाला गेले नव्हते.फौजदार,शिक्षण खात्याचे
अधिकारी घोंगडीवर बसले.कोतवालाने लगेच पाण्याचा तांब्या व कळशी तेथे मांडली व तो
कोपऱ्यात भेदरलेल्या चेहऱ्याने जाऊन उभा राहिला.
थोडं वातावरण शांत झाल्यावर फौजदार
गरजले, ‘ये बोलवारे त्या मास्तरला.’ त्यांचा आवाज ऐकून कोतवाल लगेच शाळेकडे सुटला.शिक्षणखात्याची
माणसे चिंताक्रांत चेहऱ्याने एकमेकाकडे बघू लागली.तर काही गावकऱ्यांना आतून
आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या.कोतवाल धापा टाकतच शाळेत पोहचला.गुरुजी निवांत
होते.काळजी भीती कसलीही चिंता त्यांच्या चेहऱ्यावर नव्हती.कोतवाल घाबरतच बोलला,
‘गुर्जी रावसाहेबांनी तुमास्नी बोलीवलय, चला लवकर.’ ‘व्ह म्होरं—आलोच मी.’ गुरुजी
बोलले.मग बटव्यातील तंबाखू हातावर घेऊन त्यांनी चुन्याची पितळी डबी काढली.त्यातला
चुना पितळी काडीने काढून तंबाखूला लावला.व पोरांकडे बघून म्हणाले, ‘म्हनारे
पाढा,आलोच मी.’ हातावर तंबाखू
चोळतच ते बाहेर गेले.त्यांच्या सोबत त्यांचे दोन सोबती सुद्धा कोतावालासोबत निघून
गेले.त्यांच्या मागून जरावेळाने सातवीचे विद्यार्थी, त्यानंतर सहावीचे व असे करीत
सारी शाळाच देवळाकडे जमा झाली.धोतराचा सोगा खांद्यावर टाकून अगदी डौलदारपणे गुरुजी
चालत होते.त्यांना बघून मारुतीचं सार पटांगण शांत झालं.फौजदार मिशीला पिळ देत
लोडाला टेकून बसला होता.गुरुजी जवळ येताच तो गुरकावला, ‘काय गुर्जी..तुमी म्हंजे तुमच्या पेशाला काळीमा फासताय.गुर्जी तुमी आन हे
असले धंदे? थोडीफार मनाची नाहीतर जनाची लाज ठेवा.’साहेबांचा आवाज आता टिपेला गेला
होता. ‘साहेब शब्द जपून वापरा...कसले धंदे?? कसली लाज?? काय बोलताय हे तुमाला तरी
कळतयं का?मी एका शाळेचा जबाबदार मुख्याध्यापक आहे.अन् काय आरोप लावताय?’ गुरुजी
एका दमात बोलले. ‘काय म्हंजे तुमी गावात दारू इकताय राजरोस अन् वर थोबाड उचकटून
मला बोलताय?’ साहेब घोगडी वरून बाजूला सरकून ताठ बसले.वातावरणात एकदम शांतता
पसरली.गावकरी तोंडं वासून या दोघांकडे बघत होते.पोरांचा गलका थांबला होता.गर्दीला
बाजूला सारून गुरुजी पुढे झाले.तसे साहेब कडाडले, ‘तुमच्या शाळेच्या मागे हे ड्रम
घावलेय,त्यात दारू हाय.पन्नास गावकऱ्यांनी तुमच्या विरोधात तक्रार दिलीय अन् आज हा
मुद्देमाल घावलाय गुर्जी..चोर तो चोर अन् वर शिरजोर..मादरचोद ..’साहेब एकेरीवर व
शिवीगाळीवर आले. तसे गुरुजी खवळले.साहेबांच्या नजरेत नजर मिळवून ते सुद्धा गरजले,
‘साहेब मी ऑन ड्युटी हाय ..तुमी रेड टाकली तवा मी कुट होतो?’
‘कुट म्हंजे वर्गात
होता.’
‘पोरं काय करीत व्हती
?’
‘पाढा म्हणत होती.’
‘अंग अशी ..म्हंजे
माझं अध्यापनाच काम चालू व्हतं ....बरोबर?’
‘व्हयं....’
‘तुमाला ड्राम कुट
घावलं?’
‘शाळेच्या मागच्या
गवतात...त्यावर गलास पण हाय’
‘त्याच्यावर माज नाव
हाय?’
‘नाय.’
‘मंग ड्राम वर हाय?’
‘छ्या... छ्या त्यावर
बी नाय.’
‘मंग असा बगा....या
गावात मी इस वर्स झाली हाय.माजी बदली करा असं मी खात्याला सांगतोय पण माजी बदली
व्हतं नाय .अन् दुसरं म्हण्जे हे सारं गाव
माज्या वाईटावर हाय .आज मला गोत्यात आणण्यासाठी त्यांनी गवतात दारूचे ड्राम
मांडले, उद्या गांजाचे पोते ठीवतील अन् तुमाला तक्रार देतील की गुर्जी गांज्या इकतोय.’गुरुजी
एका दमात बोलले.त्यांचे बोलणे संपल्या बरोबर गटशिक्षण अधिकारी लगेच म्हणाले , ‘बघा
साहेब मी म्हणालो नव्हतो का आमचे शिक्षक असलं काहीही करणार नाहीत.त्यांच्यावर
उगीचच हा आळ आणलाय.’ हे ऐकून फौजदार नाराज झाले.त्यांनी डोक्यावरची टोपी फट्कन
खाली आपटली.मग कडाडले, ‘कोनी अर्ज आणला होता माज्याकडं? जाम पुराव्याशिवाय काहीच
करायचे नाय हे माहित नाय का त्यांना? आमची तालुक्याची कामं सोडून आमी हितं काय
मास्तराची ......आलोय का?’ वातावरण एकदम थंड झाले.त्या वातावरणाचा रागरंग बघून
गुरुजी बोलले, ‘माज्या सहकाऱ्यांना इचारा ..हिथं
हि पोरं हैत त्यांना इचारा....पोरांनो मी दारू इकतो कारे?’ ‘न्हाय
गुरुजी..’पोरं एका सुरात ओरडली तशी गुरुजींनी समाधानाने मान डोलावली.साहेबांकडे
हसून बघत बोलले, ‘चलू का साहेब? माजं अध्यापनाचं काम राहिलंय..पोरांना शिकवायचंय
..नायतर पुन्हा तुमीच वरडाल ..चलारे पोरांनो.’ हैssss असा
आवज करून पोरं शाळेत पळाली.त्यांच्या मागून गोरखे गुरुजी व त्याचे सहकारी हात मागे
टांगून हास्य विनोदात शाळेकडे निघाले. मारुतीच्या पारावर बसलेले साहेब मात्र
साऱ्या अर्जदारांना शिव्याची लाखोली वाहत अस्वस्थपणे हातवारे करीत होते.
श्री
भीष्माचार्य लक्ष्मण चांदणे.
मु.पो.देवळाली
ता.करमाळा जि.सोलापूर.